आपल्या गाई/म्हशीच्या दुधाला कधी कधी चांगली फॅट(Fat) लागते परंतु SNF लागत नाही किंवा SNF लागते पण फॅट लागत नाही, हा बऱ्याच पशुपालकांचा अनुभव असणार. डेअरीला दुध घालताना Fat आणि SNF ह्या दोन्ही गोष्टी जर नेमून दिलेल्या प्रमाणात असतील तरच दुध घेतले जाते व चांगला भाव मिळतो.
मग आपल्याला प्रश्न पडतो की, जनावराला चांगला खुराक देऊन पण ही समस्या का होत असेल? या समस्येची उकल करण्यासाठी आपण प्रथम दुधामध्ये फॅट आणि SNF हे नेमके काय असते व ते कमी जास्त कसे होते हे थोडक्यात पाहूयात.
दुध हे चयापचयातुन मिळालेले पाणी, fat व SNF यांचे मिश्रण आहे. आता दुधातील हे घटक कसे तयार होतात ते पाहूया-
चयापचयातील पाणी- हे जनावराने पिलेल्या पाण्यापासून बनते.
फॅट-दुधातील फॅट हे प्रामुख्याने खाद्यातील फॅट, शरीरात साठलेली चरबी व कासेत तयार होणारे फॅट यापासून बनलेले असते. जनावरांना चाय्रामध्ये जर उर्जा व तंतुमय(fibre) पदार्थ जास्त असलेले घटक खायला घातले तर जनावराच्या शरीरात असणारया उपयोगी सूक्ष्मजीवाची चांगली वाढ होते व ते पुरेशा प्रमाणात फॅट(Fat) तयार करतात व हे फॅट रक्तामार्फत कासेत येऊन दुधात उतरते. आता हे उर्जा आणि तंतुमय पदार्थ म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एकदल वनस्पती ह्या याचा स्रोत असतात.
एकदल वनस्पती ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे ज्या चारा वनस्पतीचे पान लांब आहे ती एकदल उदा. ज्वारी (कडबा), मका, बाजरी. ह्या वनस्पती पासून बनलेला हिरवा चारा/किंवा याच्या धान्याचा भरडा हे दोन्ही खायला घातले तरी चालतात.
SNF (Solid Not Fat)– म्हणजे फॅट सोडून इतर स्थायू घटक (प्रथिने-केसिन, जीवनसत्वे, खनिजे, लाक्टोज). केसिन हा दुधातील SNF वर परिणाम करणारा मुख्य घटक आहे. याचे प्रमाण जर कमी झाले तर दुधाला SNF लागत नाही असे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. दुधात केसिन हे मुक्त स्वरुपात न आढळता फोस्फेट व कॅल्सियम सोबत आढळते. आता आपल्या लक्षात आलेच असेल की दुधातील केसिन म्हणजेच SNF वाढवायचे असेल तर प्रथिने, कॅल्शियम व फॉस्फरस हे तिन्ही घटक जनावरास देणे आवश्यक आहे. यापैकी प्रथिने हे द्विदल वनस्पती मध्ये आढळून येतात द्विदल वनस्पती म्हणजे ज्या चारा वनस्पतीची पाने छोटी असतात अशा वनस्पती उदा. मेथी ग्रास, चवळी, बरसीम इ. याशिवाय क्षार मिश्रणात कॅल्सियम व फॉस्फरस हे घटक असतात.
थोडक्यात
दुधातील घटक कशापासून तयार होतात ? जनावरास काय द्याल ?
उत्तर:
1.फॅट(Fat) –तंतुमय/उर्जा असणारे पदार्थ एकदल (लांब पानाच्या वनस्पती), धान्याचा भरडा(भरडा बुरशीयुक्त नसावा)
2.एसएनएफ(SNF) – प्रथिने, कॅल्सियम व फॉस्फरस द्विदल (लहान पानाच्या वनस्पती) आणि क्षारमिश्रण, खुराक.
3.पाणी(Water) – पिण्यासाठी मुबलक पाण्याची 24 तास सोय.
आता हे समजल्यानंतर आपण आपल्या जनावराचे चाऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या रीतीने करू शकता व घरच्या घरी चारयामध्ये थोडासा बदल करून दुधातील fat आणि SNF चे प्रमाण नियंत्रण करू शकता व आपल्या दुधाला चांगला भाव मिळवु शकता..