Safe and Clean Milk-स्वच्छ आणि सुरक्षित दुध उत्पादन

Safe and Clean Milk-स्वच्छ आणि सुरक्षित दूध कशाला म्हणतात ?

निरोगी जनावरांपासुन मिळणारे उच्च प्रतीचे दूध ज्यामध्ये धुळ, कचरा, माती, भुसा, शेण , Antibiotic प्रतिजैविक अंश , Aflatoxin अफ़्लाटॉक्सिन बुरशीचे अंश, कीटकनाशके विषारी रासायनिक पदार्थ इत्यादी सारख्या अपायकारक घटकांचा अंतर्भाव नसेल व ईतर कोणतीही भेसळ नसेल आणि जीवाणुंची संख्याही मर्यादित असेल अशा दुधाला Safe and Clean Milk म्हणजेच स्वच्छ आणि सुरक्षित दूध म्हणतात.

स्वच्छ आणि सुरक्षित (Clean & Safe Milk Production) दूध उत्पादनाचे फायदे

दुधाची प्रत चांगली राहुन ते आधिकाधिक काळ टिकवता येते. अश्या दुधात जीवणूंचे प्रमाण खूप कमी असते म्हणून ते मानवी आरोग्यास चांगले असते. तसेच ह्या दुधापासून बनवलेल्या दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची असते त्यामुळे त्याचे मुल्य वाढते.

स्वच्छ आणि सुरक्षित (Clean & Safe Milk Production) दूध उत्पादनासाठी घ्यावयाची काळजी

दुभत्या गाईंची स्वच्छता

1.धारा काढण्यापूर्वी जनावरांची कास व सड स्वच्छ पाण्याने किंवा सोम्य पोटॅशियम परमॅग्नेट (Potassium permanganate) च्या पाण्याने जंतुविरहित करावीत.

2.सर्वप्रथम निरोगी जनावरांचे दुध काढावे नंतर आजारी .
3.आजारी जनावरांचे दुध किंवा औषधोपचार चालु असलेल्या जनावराचे दुध इतर निरोगी जनावरांच्या दुधात मिसळु नका.
4. रोगी जनावरांचे दूध पिण्यासाठी वापरू नये.
5. नेहमीच दूध उकळून व थंड करून प्यावे असे केल्याने दुधातून प्रस्थ होणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर आळा बसतो व त्याचा प्रसार थांबवण्यास मदत होते.

गोठ्यांची स्वच्छता

परिसर व जनावरांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत.
जनावरांच्या गोठ्यातील हवा खेळती असावी.
दूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण, मलमूत्र व काडीकचरा काढून नियमित साफसफाई करावी.
गोठ्यात माश्या, डास गोचीड इत्यादी कीटकांचा शिरकाव प्रसार होऊ नये म्हणून काळजी घ्यावी.
गोठ्याच्या भिंती पक्या असाव्यात म्हणजे त्याच्या उत्पादनाला जागा मिळणार नाही. भिंतींना नेहमी चुना मारून घ्यावा.

दूध काढणाय्रा व्यक्तीची स्वच्छता

1.धारा काढणारी व हाताळणारी व्यक्ती निरोगी सुदृढ व संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असावा. अन्यथा त्याला जडलेल्या रोगांचे जिवाणू दुधातून प्रसार पावतात व इतरांस अशा दुधामधून संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
2.हाताने धारा काढण्यापुर्वी हात साबणाने धुवून कोरडे करून घ्यावेत.
3.हाताच्या बोटांची नखे व केस कापलेली असावीत डोक्यावर शक्यतो रुमाल बांधवा दूध काढणाऱ्या व्यक्तीने नेहमी स्वछ कपडे परिधान करावीत.
4.दूध काढणार्‍यांना शिंका येणे, खोकणे व धूम्रपान करणे यासारखे सवयी असू नयेत.

दुधाच्या भांड्यांची स्वच्छता –

1.दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुतलेली व जंतुविरहित असावीत.
2.भांडी योग्य आकाराची शक्यतो निमुळत्या तोंडाची भांडी दूध काढण्यासाठी वापरावी.
3.आतुन जोड , खरबरीत किंवा भेगा असलेली भांडी दुधासाठी वापरू नयेत शक्यतो स्टेनलेस स्टीलची भांडी असावीत.
4.जर मिल्किंग मशीन (Milking Machine) वापरत असाल तर ती नियमित स्वच्छ, कोमट पाण्याने धुतलेली जंतुविरहित असणे आवश्यक आहे.
5.धारा काढुन झाल्यानंतर त्वरीत लवकरात लवकर डेअरीवर द्या जेणेकरून दुधातील जीवाणुंची संख्या वाढुन गुणवत्ता कमी होणार नाही .
6.दूध विक्री केल़्यानंतर दुधाचीभांडी डीटर्जंट वापरून गरम पाण्याने धुवावीत
7.भांडी धुवून झाल्यानंतर ती कोरडी करण्यासाठी पालथी करून ठेवावीत.

दूध काढण्याची पद्धत

1.दुध काढण्यासाठी मुख्यतः तीन पद्धती वापरल्या जातात
1.चिमटा पद्धत,
2.पूर्ण हात पद्धत,
3.नकलिंग म्हणजेच अंगठा पद्धत.

यात पूर्ण हात पद्धत ही सर्वात जास्त उत्तम योग्य व सुरक्षित आहे.याला वेळोवेळी हात बदलावा लागत नाही.या पद्धतीत संपूर्ण हाताच्या पाचही बोटात सड पकडून खालच्या बाजूने ओढून समान दाब दिला जातो.समान दाबामुळे कासदाह सारख्या आजारास जनावर कमी प्रमाणात बळी पडते.

2.सडास मसाज करण्याने, वासरच्या सड चोखण्याने किंवा धारा काढण्याच्या वेळीच्या नेहमीच आवाजामुळे जनावरे पाना सोडतात. जनावरांने पाना सोडल्यानंतर पाच ते सात मिनिटात दूध काढणे आवश्यक असते सुरुवातीच्या काही धारा भांड्यात घेऊ नये, कारण यामध्ये अपायकारक जिवाणू असतात. जनावरच्या शेवटच्या धारेमध्ये जास्त प्रमाणात स्निग्धांश असतो म्हणून शेवटचे दूध नीट काढून घ्यावे. धारा पाच ते सात मिनिटात पूर्ण कराव्या. दूध काढल्यानंतर शक्य तितक्या लवकर संकलन केंद्रावर पोहच करावे आणि ते शक्य नसेल तर 3°C ला साठवून ठेवावे.

यंत्राच्या साह्याने दूध काढणे

मिल्किंग मशीन (Milking Machine) ची स्वच्छता नियमित राखणे खुप आवश्यक असते अन्यथा मशिन वापरू नये.
या पद्धतीचा उपयोग सरकारी संस्था किंवा मोठे फार्म मोठ्या प्रमाणात करतात. ही पद्धत शक्यतो जास्त जनावरांच्या दूध काढण्यासाठी वापरली जाते. या पद्धतीत सड्याला मालिश होते. समान व नियंत्रित कासेवरील दाबामुळे कासेला इजा होत नाही. शक्य असेल तर शेतकर्‍यांनी ही पद्धत अमलात आणावी. या पद्धतीत जलद दूध काढता येऊन मनुष्यबळ वाचते आणि जनावरांची एकंदर उत्पादकता समजते.

लक्षात ठेवा

1.ज्या जनावरांना Antibiotic औषधाचा उपचार करण्यात येत आहे अशा गायीचे दुध उपचारादरम्यान व उपचारानंतर 5 दिवसांपर्यंत घरी आहारात वापरू नये तसेच डेअरीवर विक्री करताना तशी कल्पना द्यावी.

2.व्यालेल्या गाईचे दुध 6 दिवस डेअरीला देवु नये .

स्वच्छ आणि सुरक्षित दूध उत्पादन (Clean & Safe Milk Production) घेणे ही काळाची अत्यावश्यक गरज आहे.यामुळे जागतिक बाजारात आपल्या दुधाला महत्वाचे स्थान मिळेल दुधाला योग्य मुल्य मिळेल एवढेच नाही तर याच्या सहाय्याने एक प्रकारे आपण, एक कुटुंब, समाज, आणि देश स्वच्छ आणि सुरक्षित दूध उत्पादनामुळे निरोगी आणि क्रियाशील ठेवण्यास मदत करणार आहोत त्यामुळे येणाऱ्या काळात स्वच्छ आणि सुरक्षित दूध उत्पादनावर भर देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

टिपणी करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Scroll to Top
Send this to a friend