गाईच्या दुधात आढळून येणारा Aflatoxin (एफ्लाटॉक्सीन)विषारी घटक म्हणजे नेमके काय आहे?
हवेत आणि मातीत आढळुन येणारे Aspergillus प्रजातीचे मृतोपजीवी सुक्ष्मजीव हे पाणी किंवा हवेतील आर्द्रतेच्या सहाय्याने हळुहळु अन्नघटकाचे विघटन करून जो एक विषारी द्रवपदार्थ निर्माण करतात त्या पदार्थाला Aflatoxin (एफ्लाटॉक्सीन) असे म्हणतात.
Aflatoxin (एफ्लाटॉक्सीन) हे विष खाद्यातून प्रथम जनावराच्या शरिरात जाते व नंतर दुधात येते. गायींचे दूध उत्पादन कमी होते व दुधाची गुणवत्ता घसरते त्यामुळे दुध व्यवसाय तोट्यात जातो तसेच त्याचे ईतरही अनेक गंभीर दुष्परिणाम उद्भवतात.Aflatoxin (एफ्लाटॉक्सीन) अंश दुधात येऊन असे दूध सेवन करणाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो यामुळे असे विषयुक्त दूध मानवी आरोग्यास धोकादायक ठरते, त्यामुळे दूध उत्पादकांनी वाळला चारा वैरण, कडबा ,काड चारही बाजुंनी झाकुण घेणे तसेच मुरघास असेल तर तो हवाबंद स्थितीत ठेवणे आवश्यक असते परंतु प्रत्यक्ष निदर्शनास असे येते की चारा पुर्णपणे झाकलेला नसतो त्यामुळे बुरशी पुर्ण झाकलेल्या चाय्रालाही खराब करते. पावसाने जनवारांचे खाद्य खराब होते .दमट, पावसाळ्याचे किंवा हवेत आर्द्रता असेलेले वातावरण बुरशीसाठी पोषक असल्याने खाद्यावर बुरशीची वाढ झपाट्याने होते.ज्याठिकाणी पाण्याचे तलाव, नदी, धरण अशा ठिकाणी वातावरण दमट असते ते Aflatoxin साठी अनुकुल असते अशाठिकाणी कोणत्याही खाद्याविषयी जास्त काळजी घेणे गरजेचे असते.
परिणामी चाय्रामध्ये ऑक्झालिक अँसिडचे प्रमाण वाढते असा चारा खाण्यात आल्याने एफ्लाटॉक्सीन (Aflatoxin)ची विषबाधा होवून जनावरे दगावण्याचा धोका निर्माण होतो.त्यासाठी माणसांबरोबरच जनावरांचे आरोग्य धोक्यात येवू नये म्हणून प्राण्यांच्या आहारातील अन्नघटकांचे एफ्लाटॉक्सीन (Aflatoxin) विषबाधेपासून संरक्षण करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आणि जबाबदारी आहे.
जनावरांच्या आहारात एफ्लाटॉक्सीन (Aflatoxin) बुरशीयुक्त चारा येण्याची प्रमुख कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय
गाईच्या आहारात वापरले जाणारे अन्नघटक उदा:
1.मुरघास(Silage)
मुरघास बनविताना निकृष्ट दर्जा चारा नजर चुकीने वापरला गेल्यास पशुंना चयापचय आजार, विष बाधा, स्तनदाह,गर्भाशय संबधीचे विकार व इतर आजार होऊ शकतात अशा आहार वापराने पशु ची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तसेच दूध व दुधाची गुणवत्ता खराब होते या साठी मार्गदर्शक सूचना चे शास्त्रशुद्ध पद्धतीने पालन करून मुरघास तयार करणे आवश्यक आहे
मुरघास मध्ये Aflatoxin (एफ्लाटॉक्सीन)चा प्रादुर्भाव कसा निर्माण होतो ?
उत्तर:
मुरघास बनविताना योग्य शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब न केल्याने .
मुरघास तयार करतांना पूर्णपणे हवा बंद न झाल्यास.
मुरघास तयार करताना हिरव्या चाय्रातील पाण्याचे प्रमाण 60% ते 70% पेक्षा जास्त असल्यास.
मुरघास तयार झाल्यानंतर जनावरांना खायला दिल्यानंतर बॅग हवा बंद न केल्यास.
मुरघास तयार करतांना रोगयुक्त किंवा बुरशी लागलेली चारा पिके वापरल्यास.
मुरघासच्या पिशवीत, खड्डयात, किंवा बंकरमध्ये पाणी किंवा हवा शिरल्यास.
बॅगेतील मुरघास केल्यानंतर त्या बॅगेमधील हवा योग्य पद्धतीने बाहेर न काढल्यास.समांतर दाब व हवा न निघाल्याने त्या मध्ये मुरघास पांढरा,काळपट सडलेल्या अवस्थेत निघतो करत काही पशु पालक काळ्या रंगाच्या 3 व 5 टनाच्या बॅगेमध्ये मुरघास भरत त्या दाबत असताना कमी
मुरघासामध्ये टाकण्यात येणाऱ्या कल्चरचे किंवा ईतर द्रावणाचे प्रमाण कमी जास्त झाल्यास.
एक चारा खराब होतो तसेच तसेच पशु आहारात टोक्सिन बायडर पावडर वापरणे आवश्यक आहे.
मुरघास मध्ये Aflatoxin (एफ्लाटॉक्सीन) टाळण्याचे प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ? :
मुरघासासाठी चारा कापताना जमिनीपासून अर्धा फूट उंचीवरून कापावा.
मुरघास तयार करतांना चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण ६५ ते ७०% पेक्षा जास्त नसावे.
कोणत्याही परिस्थितीत कुट्टी केल्यानंतर कुट्टी जास्त वेळ बाहेर तशीच ठेवू न देता बंकर, बॅग, तसेच खड्ड्यात पडली पाहिजे आणि लगेच हवाबंद करण्यासाठी तुडवली किंवा दाबली गेली पाहिजे. कुट्टी वाळू देऊ नये.जास्त वेळ बाहेर तशीच ठेवल्यास त्यातील पोषणमूल्ये नाश पावतात.मोठा खड्डा किंवा बांधकाम असेल तर कुट्टी थेट बांधकामात किंवा खड्ड्यात पडली पाहिजे
मुरघास तयार करताना 1.50 ते 2 फुटाचा थर असावा व प्रत्येक थर दाबुन हवाबंद करावा.प्रत्येक थरावर कल्चर फवारावे. मुरघास तयार करतांना तळाशी व सर्वात वर वाळलेली वैरण कुट्टी किंवा भुस्सा याचा थर द्यावा आणि व्यवस्थित दाबून हवा बंद करावा.
बंकर, बॅग, तसेच खड्ड्यातील मुरघास भरताना प्रत्येक थर तुडवला गेला पाहिजे म्हणजे हवा पूर्ण निघून जाण्यास मदत होते त्यामुळे चारा सडण्याची भीती राहत नाही. मुरघासात हवा व पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.
मुरघासाचा बंकर, बॅग,किंवा खड्डा उघडल्यास गरजेनुसार रोज मुरघासाचा थर काढून घ्यावा व पुन्हा तो हवा बंद करून ठेवावा.
रोगयुक्त तसेच बुरशी लागलेल्या चारापिकांचा मुरघास करणे टाळावे.
मुरघास तयार करतेवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात बुरशी प्रतिबंधकचा (Mold Inhibitors) वापर करावा .
2.पशुखाद्य (Cattlefeed)
पशुआहार किंवा(सुग्रास), सरकी, खपरी (शेंगदाणा पेंढ), तसेच मकाभरडा )बनविणारी संस्था वा कंपनीने सकस दर्जेदार मालाचे उत्पादन करून त्याचा पुरवठा योग्य वेळेत दूधउत्पादक वा पशुपालकां पर्यन्त करणे गरजेच आहे. कंपनीने पशुखाद्य बनविताना वापरलेला कच्चा माल हा चांगल्या दर्जाचा व बुरशीविरहित तपासणी केलेला असणे बंधनकारक असते .परंतु याची दखल घेतल्याचे बहुतांशी दिसत नाही .
सकस पशुखाद्यामध्ये योग्य प्रमाणात टॉक्सिन बाईंडर असल्यास दुधात येणारा Aflatoxin चा धोका कमी होतो परंतु भिजलेला,अयोग्य ठिकाणी साठविलेला,अयोग्य हाताळणी केलेला कमी प्रतीचा कच्चामाल जर पशुखाद्यनिर्मिती करताना वापरला गेला असेल तर अशा पशुखाद्यामध्ये Aflatoxin(बुरशी) जास्तीतजास्त प्रमाणात निर्माण झालेले असते व पुढे तेच Aflatoxin पशुखाद्य किंवा गोळी पेंढ, सरकी, मकाभरडा, शेंगदाणा पेंढ,सरकी पेंढ यांच्या माध्यमातुन जनावरांच्या शरीरात जाते त्यासाठी FSSAI ने पशुआहारातील Aflatoxin ची मर्यादा पातळी पशुखाद्य कंपन्यांना 20 ppb ईतकी निर्बंधित केलेली आहे. 20 ppb पेक्षा जास्तीचे प्रमाण असेल तर FSSAI नियमावली नुसार असे पशुखाद्य दुभत्या जनावरांना न देण्याची सक्ति केलेली आहे . दुधउत्पादक शेतकरी यांनी जागरूक राहून विश्वासार्ह पशुखाद्यपुरवठा करणाय्रा कंपनीकडुन पशुखाद्य स्वीकाऱ़ावे.शक्य झाल्यास वेळोवेळी पशुखाद्यातील Aflatoxin ची तपासणी लॅबमधुन करून घ्यावी .
पशुखाद्य वितरकाकडुन अतिरिक्त माल गोडाउन मध्ये दीर्घकाळ साठवुन ठेवला गेला असेल तर अशा पशुखाद्यामध्ये Aflatoxin प्रादुर्भाव वाढलेला असतो त्यासाठी दूध उत्पादक यांनी जागरुकरतेने पशुखाद्य बॅगवरील Manufacturing Date तपासुन मगच पशुखाद्य स्वीकृत करणे आवश्यक आहे .पण कधी कधी पुरवठा साखळीमध्ये संबंधित Manufacturing Date मध्ये बदल करून किंवा नष्ट करून आर्थिक फायद्यासाठी कालबाह्य पशुखाद्य वितरीत करण्याचे गैरप्रकारही काही ठिकाणी घडत असतात परंतु तेव्हा पशुखाद्यामध्ये Aflatoxin चे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त वाढलेले असते त्यासाठी प्रत्येक पशुखाद्य कंपनीने जबाबदारीने पशुखाद्य पॅकिंग वरील Manufacturing Date डोळ्यांना स्पष्ट दिसणारी व सहज न पुसता येणारी प्रिंन्ट करणे आवश्यक आहे जेणेकरून कालबाह्य कमी प्रतीचे पशुखाद्य वितरकाकडुन दूध उत्पादक यांना वितरीत होणार नाही. असे कमी प्रतीचे पशुखाद्य जनावरांसाठी तसेच दूधव्यवसायासाठी धोकादायक ठरते .
पशुखाद्य किंवा सुग्रास,सरकी,खपरी किंवा शेंगदाणा पेंड,मकाभरडा वा इतर तेलबिया खाद्या मध्ये Aflatoxin (एफ्लाटॉक्सीन) येण्याची कारणे ?:
उत्तर :पशुखाद्द्य(गोळी पेंढ(सुग्रास), सरकी, खपरी (शेंगदाणा पेंढ), मकाभरडा ) साठवणूक अति दमट ठिकाणी दीर्घकाळ केल्यास किंवा पाण्याशी संपर्क आल्यास किंवा खाद्य पावसात भिजल्यास.
कारखान्यात पशुखाद्द्य(गोळी पेंढ(सुग्रास), सरकी, खपरी (शेंगदाणा पेंढ), मकाभरडा )तयार करताना बुरशी असलेला कच्चा माल वापरलागेल्यास पशुखाद्यामध्ये Aflatoxin चे प्रमाण आढळुन येते .बुरशी लागलेली मका किंवा मकाभरडा , कुजलेले ,खराब किंवा टाकाऊ तेलबीयांच्या चोथ्यापासुन बनवलेली शेंगदाणा पेंढ(खपरी पेंढ) आणि सरकी, भिजलेला सोयाबिन भुसा दीर्घकाळ साठविल्यास यामध्ये Aflatoxin विषारीघटक मोठ्याप्रमाणात आढळुन येतो. असे खाद्य काही दिवसानंतर जनावरांना खाऊ घातल्यास गायीच्या शरीरात आणि दुधात Aflatoxin दिसून येते .
कालबाह्य पशुखाद्य( गोळी पेंढ, सरकी, खपरी शेंगदाणा पेंढ, मकाभरडा )यांची दीर्घकाळ अयोग्य साठवणुक केल्यामुळे यामध्ये Aflatoxin चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळुन आलेला दिसतो.कालबाह्य बुरशीयुक्त खाद्य व चारा जनावरांना दिल्यामुळे रोगप्रतिकारशक्ति कमी होउन जानावरे सतत अनेक आजाराला बळी पडत असतात.
पशुखाद्यामध्ये 9 ते 10% पाण्याचा अंश असतो त्यामुळे मर्यादित कालावधीपेक्षा जास्त काळ पशुखाद्य साठवुन ठेवल्यास अशा पशुखाद्यामध्ये Aflatoxin (बुरशी) निर्माण होण्याची शक्यता दाट असते.
पशुखाद्य किंवा सुग्रास,सरकी,खपरी किंवा शेंगदाणा पेंड,मकाभरडा वा इतर तेलबिया खाद्या मध्ये Aflatoxin टाळण्याकरिता काय प्रतिबंधात्मक उपाय आहेत ?:
पाशुखाद्य कालबाह्य झालेले नसावे.पशुखाद्य किंवा गोळी कांडी पेंड यामध्ये 10% च्या जवळपास आर्द्रता असते त्यामुळे निर्धारीत कालावधीदरम्यान त्याचा वापर होणे आवश्यक आहे.
पशु खाद्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धान्यास बुरशी लागलेली नसावी.
पशुखाद्य खरेदी करताना उत्तम दर्जाचे तसेच पाण्याचे प्रमाण पाहून खरेदी करावे.
पशुखाद्य तसेच धान्याची साठवणूक नेहमी कोरड्या व हवेशीर ठिकाणी करावी.
पशुखाद्द्यास ओलावा किंवा पाणी लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी.
बुरशीयुक्त सरकी पेंड वा इतर तेलबिया खाद्य , पशुखाद्द्य, हिरवा चारा, किंवा मुरघास जनावरास देऊ नये.
दुधाळ जनावरांच्या आहारात नेहमी चांगल्या प्रतीचे टॉक्सीन बाईंडर असलेलेच पाशुखाद्य वापरावे
पशुखाद्या साठा हा कोरड्या जागी जमिनीपासून आणि भिंतींपासून अलग असावा .
पशुखाद्य साठविताना त्याचा जमिनीला संपर्क येईल असे न ठेवता फळ्या किंवा पेलेटस वर ठेवावे.पशुखाद्य भिंतीला चिटकून न ठेवता हवा खेळती राहण्यासाठी भिंतीपासून अर्धा ते एक फूट अंतरावर ठेवावे. जेणेकरून भिंतीतील दमटपणा पशुखाद्यास न लागल्यामुळे बुरशीची वाढ टाळली जाईल.
बरेच दूध उत्पादक मक्याचा भरडा जनावरांना खायला देतात.
मका साठविताना तो व्यवस्थित वाळला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. चांगल्या गुणवत्तेच्या पेंडीचा वापर करावा. पेंडीचा साठवणूक कोरड्या जागी करावी.
३ .बार्ली (Barley)
कारखान्यातून निघणारे टाकाऊ पदार्थ मोलासेस, बार्ली इत्यादी अवेळी जनावरांना खाऊ घातल्याने गाईच्या पोटात मोठ्या प्रमाणात Aflatoxin निर्माण होते.
बार्ली किंवा स्टार्च बऱ्याच प्रमाणात जनावरांना आहार म्हणून वापरले जातात.
हा आहार देताना तो 24 तासाच्या आत ताजा असतानाच देणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच वेळेस हा आहार जनावरांना ताजा दिला जात नाही. असा आहार २-३ दिवसांनी कधी कधी तर ८ दिवसांनी सुद्धा दिला जातो. त्यामुळे बार्लीमध्ये पांढऱ्या बुरशीचा थर जमा होतो.अश्या आहारातून विषबाधा होऊन जनावर दगावण्याची शक्यता असते. आहारात सतत बुरशीयुक्त बार्लीचा वापर केल्यामुळे जनावराच्या पोटात जास्त प्रमाणात एफ्लाटॉक्सीन (Aflatoxin) जाते. त्यामुळे जनावराची भविष्यात उत्पादन क्षमता, प्रजनन क्षमता व आरोग्यावर घातक परिणाम होतात.
बार्लीमुळे जरी जनावरांचे काही अंशी दुध वाढले किंवा आहारावरील खर्च कमी होत असला तरी त्याचा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो.
४ .हिरवा ताजा चारा (Green Fodder)
हिरवाचारा जसे की घास ,मका,कडवळ ,कुट्टी वगैरे जर 24 तासांपेक्षा दिर्घकाळ दाबुन दडपुन किंवा मातीच्या संपर्कात ठेवलेलेला असेल तेव्हा हिरव्या चाय्रात Aflatoxin विषारीघटक मोठ्याप्रमाणात निर्माण होतो.हिरव्या चाऱ्यामध्ये रसशोषक कीटकांचा तसेच अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ते जनावरांच्या खाण्यात आल्यास. हिरवा चारा साठवताना तो उभा करून ठेवावा जेणे करून चाऱ्यामध्ये हवा खेळती राहील. चाऱ्यामध्ये उष्णता निर्माण होऊन त्यामुळे बुरशी होणार नाही.
चारा पिकांना बुरशी लागू नये, यासाठी आवश्यकतेनुसार जैविक बुरशीनाशके यांची फवारणी करावी.
५ .पुर्ण वाळलेला चारा (Dry Fodder)
दीर्घकाळ दाबुन दडपुन ठेवलेली पावसात किंवा पाण्याने भिजलेली वाळली वैरण ,कडबा, भुसा ,काड व ईतर वाळला चारा यामध्ये मोठया प्रमाणात Aflatoxin विष निर्मांण झालेले असते. चारा पूर्णपणे वाळलेला नसताना रचून ठेवल्यास किंवा वाळलेला चारा पावसात भिजल्यास.वाळलेला चारा उदा. ज्वारीचा, बाजरीचा कडबा, मका, कडवळ, गहू, तूर, हरभरा, सोयाबीनचा भुसा पावसात किंवा पाण्याने भिजुन दीर्घकाळ साठविल्यास.
जनावरांच्या आहारातील Aflatoxin (बुरशी) प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना –
बऱ्याच वेळेस काळजी घेऊनसुद्धा किंवा बुरशी दिसत नसल्यामुळे एफ्लाटाॅक्सिनचा काही भाग हा जनावराच्या पोटात जाण्याची शक्यता असते, यासाठी आपण टाॅक्सिन बाइंडरचा (Toxin Binder ) नियमित वापर करू शकतो.वेगवेगळ्या प्रकारचे बाइंडर आहारातून आलेल्या अफ्लाटाॅक्सिनला बाइंड करून (बांधून) शेणातून बाहेर टाकण्यास मदत करतात.ज्या ठिकाणी असे पशुखाद्य देणे शक्य नाही, त्या वेळी ठराविक मात्रा 50 ग्रॅम सकाळ 50 ग्रॅम संध्याकाळ त्या जनावराच्या आहारात म्हणजे पशुआहार, पाणी किंवा पिठाचा गोळा करून त्यातून देता येते.
जनावरांचा हिरवा चारा, सुका चारा व पशुखाद्य देण्यापूर्वी त्याची योग्य प्रकारे तपासणी करावी.
वाळलेला आणि स्वच्छ कडबा द्यावा. बुरशीयुक्त पांढसर व पांढुरके ठिपके असलेला कडबा, कुट्टी जनावरांना खायला देऊ नये. .
चारा भिजणार नाही अशा रीतीने रचून व झाकून ठेवावा तसेच गरजेनुसार शेडची व्यवस्था करावी.
सुका चारा साठविताना तो पूर्णपणे सुकलेला असावा.
वैरण, वाळला चारा पाण्याच्या व मातीच्या संपर्कात येणार नाही अशा स्थितीत चारही बाजूने झाकून ठेवावा पावसाळ्यात सुका चारा भिजू नये म्हणून ज्या प्रमाणे वरून चारा झाकला जातो त्या प्रमाणे बाजूंनीसुद्धा चारा झाकावा.
असिडॉसीस (पोटफुगी) मात करण्यासाठी जनावरांच्या आहारात दररोज खाण्याचा सोड्याचा वापर करावा.(५०ग्रॅम./दिन).
घरी,हॉटेल किंवा समारंभातील उरलेले तसेच बुरशी लागलेले अन्न खाऊ घालु नये .
Aflatoxin Rapid Test (Elisa Test)
गाईच्या दुधामध्ये जर Aflatoxin अवशेष आढळुन येत असतील किंवा Aflatoxin( + )तपासणी सकारात्मक असेल तर त्यावर तातडीने नियंत्रण करण्यासाठी मात्र एकच उपाय आहे .
संबंधित दुभत्या गाईचे बाधित पशुखाद्य असेल किंवा बाधित चारा असेल तो तातडीने बंद करून खात्रिशीर बुरशीविरहीत पशुखाद्य आणि चारा गाईच्या आहारात वापरणे त्याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टॉक्सिन बाईंडर चा डोस योग्य प्रमाणात ठराविक कालावधीसाठी नियमित देणे.
एफ्लाटॉक्सीन (Aflatoxin) बुरशी चे गाईच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम –
1.गायी मध्ये जास्तीची दूध उत्पादन क्षमता असूनदेखील गाई एफ्लाटॉक्सीन (Aflatoxin) आहारातील प्रमाण वाढल्याने आवश्यक ते दूध उत्पादन देऊ शकत नाही.
2.गायीना सर्व आवश्यक खुराक घटक नियमितपणे देऊन सुद्धा दुधाची गुणवत्ता खालावते-
3.गायीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते.त्यामुळे गाई वारंवार आजारी पडतात.
4.कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन जनावरांच्या अवयवाची हालचाल मंदावते. प्रसंगी जनावरे दगावतातही.
5.चाऱ्याचा कुबट वास आल्याने जनावर चारा कमी खाते त्यामुळे दूध उत्पादन कमी होते.
6.जनावर सुस्तावते, शरीराच्या तापमानात वाढ, लाळ गाळणे, खाणे-पिणे बंद होणे, जनावर एकाच जागेवर थांबून राहणे, नाक कोरडे पडणे, लघवीला त्रास होणे, जनावरांच्या मांड्यावर सुज येते, श्वसनाचा त्रास होतो
7.प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होतो गर्भाची पूर्ण वाढ होत नाही, परिणामी गर्भपात होतो.
खुरांचे विकार जडतात यकृतास इजा होते,
8.मुत्रपिंडावर दुष्परिणाम होतात
9.वासरांची वाढ खुंटते.दुधातील फॅट व एसएनएफचे प्रमाण कमी होते.
10.काससुजी होते त्यामुळे वैधकीय खर्च खूप जास्त होतो.
11.जनावरांमध्ये माजाच्या तक्रारी निर्माण होतात परिणामी जनावर सांभाळण्याचा खर्च वाढतो.
12.गायी अनियमित माजावर येतात तसेच त्या वारंवार उलटतात.
13.रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावरे वारंवार आजारी पडतात.
14.जठर व आतड्यास इजा होऊन रक्तस्त्राव होतो.
15.जनावराला सारखी हगवण लागल्याने जनावर अशक्त होते.
16.बुरशीयुक्त चारा जास्त खाण्यात आल्याने शरीरावर तेज दिसत नाही.
एफ्लाटॉक्सीनचे (Aflatoxin) मानवी आरोग्यावर होणारे घातक दुष्परिणाम
1.लहान मुलांची योग्य वाढ होत नाही.
2.अपचन होते तसेच पोटात सारख्या वेदना होतात.
3.सारखा ताप येतो,कावीळ होते.
4.अवयवांचे कर्करोग तसेच यकृताचे आजार जडतात.
5.रोगप्रतिकारक शक्ती कमी होते परिणामी मृत्यू येऊ शकतो.
6.भुक मंदावते त्यामुळे अशक्तपणा येतो.
7.फुफ्फुसाचा दाह होतो तसेच मूत्रपिंडाचे कार्य बंद होते.
8.मळमळ होणे
9.त्वचा आणि स्क्लेरा (इक्टेरस) पिवळसर होणे
10.खाज सुटणे
11.उलट्या होणे
12.रक्तस्त्राव येणे
13.पोटदुखी
14.सुस्ती येणे
15.अंगावर सूज येणे
16.स्नायू आकुंचन
17.कोमा
18.मुदतपूर्व जन्म
19.उशीरा गर्भपात
20.प्रसंगी मृत्यू ओढवु शकतो